‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळ्यामध्ये त्यांच्या पक्षाच्यावतीने शुक्रवारी मूक मोर्चा काढण्यात आला. गुरुवारी ओवैसी हे उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केल्याचे ओवैसी यांनी सांगितले. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हापूर पोलिसांची विविध पथके याप्रकरणी तपास करत असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ओवैसी गुरुवारी मीरत येथे गेले होते.
ओवेसींवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात एमआयएमचे आमदार डॉ. फारुख शहा यांच्या नेतृत्वाखालील मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चानंतर आमदार डॉ. फारुख शहा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “असदुद्दीन ओवेसी यांच्यावर याआधी देखील त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा ओवेसी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे,” असंही डॉ. फारुख शहा म्हणालेत.





